पुणे शहराची बहुसांस्कृतिक विविधता ही ओळख निर्माण करत स्वत्व न विसरलेला परिसर, 'औंध,बाणेर,पाषाण'
पाषाण टेकडी आणि पाषाण तलावाच्या आसपासचा निसर्ग, शांतता आणि हिरवाई यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याचा अनुभव आला. थंड वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांचे किलबिलाट मनाला प्रसन्न करणारा होता. पुणे शहराची भौगोलिक रचना बशीप्रमाणे असल्याचे न्युजपेपरमध्ये वाचले होते,ते प्रत्यक्ष दिसले पाषाण टेकडी,चतूश्रूंगी टेकडी, तेथून नवले पुलाच्या कडेकडेने हवेली तालूक्यातील आंबेगाव मार्गे कात्रज आणि तेथून मुख्य मुंबई- बंगळूर महामार्ग ही बशीची एक बाजु तर माझ्या नाशिककडे जाताना लागणारा घाट सेक्शन जो एक टप्पा पार करत सासवड मार्गे कात्रजला मिळतो ती दुसरी बाजू म्हणता येईल. बाकी याला तळजाई,पर्वती अस्या छोट्या बाजु आहेत,पण त्या सोडून देयूया.असो.
पाषाण बघितल्यावर माझ्या ऍक्टिव्हाची चाके वळली तरी औंध परिसराकडे औंधमध्ये पोहोचल्यावर मला पुणे शहराचे एक वेगळेच रूप दिसले. पुणे शहराच्या पेठांमध्ये न दिसणारे रूंद रस्ते, आकर्षक कॅफे, ब्रँडेड दुकाने आणि स्वच्छता यामुळे औंध हा परिसर पुण्याच्या विकसित भागांपैकी एक असल्याचे लगेच लक्षात येते.येथे फिरताना सेनापती बापट रोड फर्ग्युसन रोडवर दिसते त्या प्रमाणे तरुणाईची उत्साही वर्दळ आणि आधुनिक जीवनशैली स्पष्टपणे दिसून येत होती.
यानंतर मी बाणेरकडे मोर्चा वळवला. बाणेरमध्ये आयटी क्षेत्रामुळे निर्माण झालेली वेगळीच गती अनुभवायला मिळाली. उंच इमारती, आयटी कंपन्यांची कार्यालये आणि त्याभोवती विकसित झालेली रहिवासी वसाहत हे सर्व पाहून पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाची जाणीव झाली. रस्त्यांवरील वाहतूक, कॅफे संस्कृती आणि संध्याकाळी जिवंत होणारे वातावरण यामुळे बाणेरची वेगळी ओळख त्याच्या मनात ठसली.
या संपूर्ण प्रवासात स्वतःच्या टुव्हिलरने फिरताना रस्त्यांची ओळख झाली, तसेच विविध भागांतील जीवनशैलीतील फरकही जाणवला. या दरम्यान मला जाणवलेली एक ठळक गोष्ट म्हणजे भलेही आयटी उद्योगामुळे असेल,या भागाची सर्वसाधरण भाषा ही हिंदी झाली आहे.या दरम्यान मी पत्ता विचारण्यासाठी काही लोकांना शुद्ध मराठीत विचारले तरी मला उत्तर मात्र हिंदीतून बांये जाये, दांऐ जाये असे मिळाले.मी सेनपती बापट रोड आणि फर्ग्युसन रोडवर अनेकदा फिरलोय तिथे हिंदी मोठ्या प्रमाणात ऐकु येत असली तरी मराठीत विचारलेल्या प्रश्नांना मराठीतच उत्तर मिळण्याचा अनुभव आतापर्यत मला आलायं.पण हा अनुभव मलातरी नविन होता.अखेर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी बहुसांस्कृतिक विविधता असलेल्या शहरात बदलत आहे असेच म्हणावे लागेल.मात्र मी जे पाषाण,औंध आणि बाणेर बघितले तिथे पारंपरिक संस्कृती ही मोठ्या प्रमाणात दिसली .म्हणजेच पुणे शहराची बहुसांस्कृतिक विविधता ही ओळख कायम करत स्वत्व न विसरलेला परिसर, 'औंध,बाणेर,पाषाण' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा